भाजपच्या महिला प्रदेश पदाधिकारी चित्रा वाघ यांचा घणाघात
जळगाव (प्रतिनिधी) – राज्याची स्थिती महाविकास आघाडीने वाईट करून ठेवली आहे. माझी कुटुंब, माझी जबाबदारी ही फक्त टेप वाजवू नका, त्याची खरोखर जबाबदारी निभवावी. अत्याचाराच्या घटना वाढत असून महिलांच्या सुरक्षेसाठी काय करणार ते सांगा असा घणाघात भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेश पदाधिकारी यांनी बुधवारी 11 नोव्हेंबर रोजी पत्रपरिषदेत केला.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणी भाजप महिला आघाडीतर्फे बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना, पोलीस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले. पारोळ्यात मयत विद्यार्थिनीच्या घरी देखील भेट घेतल्याचे सांगत, राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहे. राज्यातील महिला, मुलींवर सामूहिक अत्याचाराच्या घटनांची राज्यातील मंत्र्यांनी आजवर साधी दखल देखील घेतला नाही. मग महिला सक्षमीकरण कसे साधणार ? असा आरोप भाजपच्या प्रदेश पदाधिकारी चित्राताई वाघ यांनी बुधवारी पत्रपरिषदेत केला.
पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, आ.राजुमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष उज्जवला बेंडाळे, माजी आ.स्मिता वाघ आदी उपस्थित होते.
खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा. पोलीस दलातील उणिवा गृहमंत्र्याने कमी कराव्या.फॉरेन्सिक लॅबला अद्ययावत केले पाहिजे. महिलांच्या तक्रारी पोलीस स्टेशनला घेतल्या जात नाही. महिला सुरक्षेसाठी नेमके काय करणार आहे, ते सांगा असेही चित्रा वाघ यांनी सांगितले.
महिला अत्याचारावर भाजपचा लढा चालूच राहील. आम्ही पाठपुरावा सुरूच ठेवू, असेही वाघ यांनी सांगितले.