मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना वैद्यकिय व्यवस्था मात्र कोलमडताना दिसतेय. अश्यावेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने गेल्या वर्षी लोकांना मदत करण्यास सुरवात केली. त्या मदतीचा ओघ आजही तितक्याच जोराने कायम आहे. देशात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा सध्या तुटवडा असल्यामुळे सोनू सूदने देशात ऑक्सिजनची कमतरता भागविण्यासाठी इतर देशांकडून ऑक्सिजन प्लान्ट घेण्याचे ठरविले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सोनू सूदने फ्रान्स आणि अन्य ३ देशांमधून ऑक्सिजन प्लान्ट भारतात वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यासाठी आणणार असल्याची माहिती मिळत आहे.
सध्या दिल्ली आणि महाराष्ट्रासह कोरोनाने प्रभावित असलेल्या राज्यात कमीतकमी चार ऑक्सिजन प्लान्ट बसवण्याचा सोनू सूदचा विचार आहे. याबद्दल बोलताना सोनू सूद म्हणाला कि, ‘आम्ही ऑक्सिजन सिलिंडरच्या कमतरतेमुळे बर्याच लोकांना त्रास सहन करताना पाहिले आहे. आम्हाला ते आता मिळाले आहे आणि ते आधीपासूनच लोकांना देत आहेत. तथापि, या ऑक्सिजन प्लान्ट केवळ संपूर्ण रुग्णालयांनाच पुरवठा करणार नाहीत तर ऑक्सिजन सिलिंडरही भरुन काढतील आणि कोरोनाची लागण झालेल्या लोकांची एक मोठी समस्या सुटेल.
मिळालेल्या रिपोर्टनुसार पहिल्या प्लान्टची ऑर्डर देण्यात आली आहे. पुढील १० ते १२ दिवसांत फ्रान्समधून हा ऑक्सिजन प्लान्ट भारतात येईल. सोनू सूद पुढे म्हणाला कि, ‘वेळ आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हान आहे आणि प्रत्येक गोष्ट वेळेवर येईल आणि आम्ही अधिक जीव गमावू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत’. सोनू सूदच्या या कामगिरीवर पुन्हा एकदा सर्व स्तरांवरून कौतुकाचा वर्षाव होतोय. इतकेच नव्हे तर नेटकरी सोनू सूद पंतप्रधान असायला हवा होता, तुम्ही नवी पार्टी बनवून इलेक्शन लढा, तुमची गरज आहे आम्हाला, अश्यासमीक्षा दिल्या आहेत. तर एका युजरने म्हटले आहे कि, ऍक्टर काम करतोय आणि साकार ऍक्टिंग. अश्या प्रकारे सोशल मीडियावर पुन्हा एकदा सोनू सूदच्या कार्याचे कौतुक होते आहे.