बीड (वृत्तसंस्था) – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजत आहे. रुग्णांचे हाल, आरोग्य सुविधेचा तुटवडा आणि वाढत जाणारी रुग्णसंख्या यामुळे आर्थिक व्यवस्था कोलमडून गेली आहे. देशात करोनाबाधितांची संख्या सर्वाधिक महाराष्ट्रात होती त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात लॉकडाउन लावण्यात आला.
प्रशासनाने घराबाहेर पडू नये अशा वारंवार सूचना देऊनही व राज्यात संचारबंदी कायदा लागू असताना सुद्धा अनेक ठिकाणी सामान्य जनतेसह राजकीय नेत्यांकडूनही कायद्याची पायमल्ली होतांना दिसून येते. अशातच बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीच सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडवला आहे.
सोशलवर व्हायरल व्हिडियोमध्ये धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये महिलांसाठी कोविड सेंटरचे उद्घाटन पार पडले. पण, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. सार्वजिक ठिकाणी गर्दी करू नये, अशी सूचना प्रशासनाकडून वारंवार केली जात असतानाही सर्व नियम न पाळत सोशल डिस्टसिंगचे तीन-तेरा होतांना दिसून आले. त्यामुळे सर्वसामान्यांना वेगळे नियम आणि मंत्र्यांना वेगळे नियम असता का, असा सवाल सोशलवर विचारण्यात येत आहे.