हेग (वृत्तसंस्था) – भारतात सापडणाऱ्या दुहेरी उत्परावर्तित विषाणूची वर्गवारी जागतिक आरोग्य संघटनेने चिंताजनक या गटात केली आहे. हा विषाणू अधिक संसर्गशील आणि धोकादायक आहे. मात्र, तो लसींचा प्रतिकार करू शकत नाही, असे डब्ल्यूएचओच्या मुख्य संशोधक सौम्या स्वामीनाथन यांनी स्पष्ट केले.
हा दुहेरी उत्परावर्तित विषाणूमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या विषाणूचे अस्तित्व आहे. भारतात होणाऱ्या बधितांच्या वाढीमुळे विषाणूचे आणखी धोकादायक अवतार निर्माण होण्याची शक्यता आहे. प्राथमिक तपशिलावरून विषाणूंचा भारतीय अवतार हा अधिक संसर्गशील आहे.
भारतातील करोनाच्या वाढीमध्ये विषमपणा अधिक आहे. भारतातील करोनाबाधितांची संख्या आणि मृत्यू याची जागतिक आरोग्य संघटनेला काळजी वाटते. जगात आणि दक्षिण आशियात बाधितसंख्या स्थिरावताना दिसत आहे. मात्र, दक्षिण पूर्व आशियात भारतामुळे ती वाढताना दिसत आहे. एकूण बाधितांची संख्या लपवली जात आहे. त्यामुळे राज्य आणि स्थानिक पातळीवरील तपशिलाचा सखोल अभ्यासाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतात आढळलेले विषाणूचे सात अवतार
1) दुहेरी उत्परावर्तित विषाणू (बी.1.617) – हा विषाणू इ484क्यू आणि एल452आर या दोन विषाणूंपासून बनला आहे. हा विषाणू महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्लीतील नमुन्यात सापडत आहे.
2) ब्रिटिश विषाणू (बी.1.1.7) – विषाणूंचा हा अवतार भारतात 29 डिसेंबरला आढळला. त्यानंतर तो शेकडोंच्या संख्येने आढळला. मात्र, त्याची सर्वाधिक संख्या पंजाबमध्ये होती.
3) द. आफ्रिका विषाणू ( बी. 1.351)- हा विषाणू भारतात प्रथम फेब्रुवारी महिन्यात आढळला. हा विषाणू उत्परावर्तित झाला. त्याचे नाव एन501वाय हा अधिक संसर्गशील होता. तो प्रतिपिंडांना कमी दाद देत असे.
4) ब्राझीलचा विषाणू (पी.1) – हा भारतात प्रथम 30 मार्चला महाराष्ट्रात आढळला.
साथ नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या माहितीनुसार, हे सर्व विषाणू अधिक वेगाने संसर्ग करतात. त्यामुळे बाधितांची संख्या वेगाने वाढते.
5) एन440के विषाणू – हा मुख्यत्वे दक्षिण भारतात विशेषत्वाने आंध्र आणि तेलंगणात आढळला. हा विषाणू अधिक धोकादायक आहे. त्याचा संसर्ग झाल्यानंतर केवळ तीन ते चार दिवसात अत्यवस्थ होतो.
6) बी.1.617 विषाणू
7) बी.1 विषाणू
या दोन्ही विषाणूंविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे, पण संशोधक हे विषाणू एन 440 के पेक्षा अधिक घातक असल्याचे सांगतात.