जळगाव ( प्रतिनिधी ) – राष्ट्रीय सांघिक बुध्दिबळ स्पर्धेच्या आजच्या सकाळच्या फेरीअखेर महिला गटात ८ गुणांसह विमानतळ प्राधिकरण संघ तर पुरुष गटात विमानतळ प्राधिकरण व रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड ‘ ब ‘ संघ ९ गुणांसह संयुक्तरित्या आघाडीवर आहेत
अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटना आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सांघिक बुध्दिबळ स्पर्धा प्रेसिडेंट कॉटेज सुरू आहेत.जळगावातील या बुध्दिबळ स्पर्धेचे प्रायोजकत्व अशोक जैन ( अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि.) यांनी स्विकारले असुन ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे होत आहे.
सकाळी झालेल्या महिलांच्या ४ फेरीत पहिल्या पटावर विमानतळ प्राधिकरणच्या अर्पिता मुखर्जी व आर वैशालीने अनुक्रमे आंध्रा राज्य संघाच्या निहारिका व कोटेपल्ली साई निरुपमा यांचा पराभव करीत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली दिव्या व प्रियांका यांनी सहजरीत्या बरोबरी स्वीकारत ३-१ ने संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या पटांवरील सामने कमालीचे एकतर्फी झाले पेट्रोलियम स्पोर्ट्सच्या सौम्या स्वामिनाथनने अंजली सागर यांच्या राजावर आपल्या मोहऱ्यांनी अचूक हल्ला चढवत राजाला जेरीस आणले, पांढऱ्या उंटाची एफ ७ प्यादाला मारण्याची युक्ती अंजली सागर यांना न उमगल्याने त्यांचा राजा विचित्र कोंडीत सापडला पण सौम्याच्या उंट व घोडा वजीराच्या समन्वयाचा अंदाज न आल्याने त्यांना शरणागती पत्करावी लागली. मानांकित खेळाडूंच्या सहज विजयामुळे पेट्रोलियम स्पोर्ट्सने गुजरात राज्य संघाचा ४-० असा पराभव करीत आपले आव्हान जिवंत ठेवले.
उद्या होणाऱ्या महिलांच्या पाचव्या फेरीत विमानतळ प्राधिकरण ओडिशा राज्य संघाबरोबर तर पेट्रोलियम संघ महाराष्ट्र अ संघांसोबत समोरासमोर भिडतील.
पुरुष गटातील पाचव्या फेरीतील सामन्यांमध्ये कडवी लढत पहावयास मिळत असून पहिल्या पटावर रेल्वे अ संघाने विमानतळ प्राधिकरण संघाला चांगलेच झुंजवत सर्व पट अनिर्णीत राखण्यास यश मिळवले.
अरविंदने दिपेन चक्रवती सोबत खेळताना कारो कान बचाव पद्धतीचा अवलंब केला पण दिपेन ने डावाच्या सुरवातीलाच एच ३ चाल खेळत अरविंद ला बुचकळ्यात पाडले, अरविंद ने आपले दोन्ही घोडे सी ४ व ब ६ वर मजबूत बसवल्यामूळे त्याच्याकडे डावाच्या मध्यभागी वरचष्मा होता पण दिपेन ने योग्य वेळी खेळलेल्या ए ४ प्यादाच्या चालीमुळे, मोहोऱ्यांची मारामारी करणे अरविंद ला क्रमप्राप्त झाले व लवकरच दोन्ही खेळाडूंनी बरोबरी स्वीकारली.
दुसऱ्या पटावर रेल्वे च्या ब संघाने तामिळनाडू संघाचा ३-१ ने पराभव करीत, पुढील फेरीसाठी पहिल्या पटावर कूच केले.
तिसऱ्या पटावरील संघांमध्ये सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्डाच्या संघाने आक्रमक खेळ करीत महाराष्ट्र क संघाचा पराभव २.५- १.५ ने पराभव करीत ८ गुणांसह संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.
पाचव्या फेरी अखेर विमानतळ प्राधिकरण व रेल्वे ब संघ ९ गुणांसह संयुक्त रित्या पहिल्या स्थानावर असून सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड व रेल्वे अ संघ ८ गुणांसह द्वितीय स्थानावर आहेत.सायंकाळच्या पुरुष गटांतील सहाव्या फेरीत अरविंद चिदंबरम चा विमानतळ प्राधिकरणाचा संघ रेल्वेच्या ब संघाबरोबर पहिल्या पटावर भिडणार असून, सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड दुसऱ्या पटावर रेल्वेच्या अ संघाबरोबर भिडणार आहे.