श्रीनगर ( वृत्तसंस्था )- जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरच्या बरौम भागात आज भारतीय सेनेचं चीता हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. आधी एका हेलिकॉप्टर पायलटचा मृत्यू झाला होता, दुसरा गंभीर जखमी झाला होता. आता उपचारादरम्यान दुसऱ्याही पायलटचा मृत्यू झाला आहे. मेजर संकल्प यादव हे 29 वर्षाचे होते. या सह-वैमानिकाचा 92 बेस हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची माहिती संरक्षण विभागाकडून देण्यात आली . कित्येक प्रयत्नानंतरही त्यांना वाचवण्यात यश आलेलं नाही.
काही महिन्यांपूर्वीच हेलिकॉप्टर अपघातातत सीडीएस बीपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांच्या मृत्युने देशाला हादरवून सोडले होते.
जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात भारतीय सैन्य रात्रीचा दिवस एक करून पहारा देत आहे. सीमेपलीकडील दुश्मनांशी आणि दहशतवाद्यांशी मोठ्या हिमतीने लढत आहे. मात्र अशा दुर्घटना सैनिकांसोबतच घडल्यावर देशाच्या डोळ्यात पुन्हा पाणी उभा राहतं. या हेलिकॉप्टर दुर्घटनेने भारतीय सैन्याला आणि देशवासियांना पुन्हा नव्या जखमा दिल्या आहेत. गेल्या काही दिवसात हेलिकॉप्टर दुर्घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.