आ. खडसेंचे आरोप मान्य नाही :
पत्रपरिषदेत दिली माहिती
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक निवडणुकीत काँग्रेसचे संचालक फुटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे गटनेते आ. एकनाथराव खडसे यांनी केला आहे. मात्र संध्याकाळी पत्रपरिषद घेऊन काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप फेटाळून लावत, आमचे नव्हे तर राष्ट्रवादीचेच संचालक फुटले अशी माहिती दिली आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रांत एकच चर्चा रंगली असून महाविकास आघाडीत थेट नेत्यांमध्येच आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
शनिवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र पाटील यांना आश्चर्यकारक पराभव स्वीकारावा लागला आहे. यात शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवार यांना संचालक करण्याची खेळी यशस्वी केली. यात शिवसेना शिंदे गटाचे ६, भाजप १, राष्ट्रवादी बंडखोर संजय पवार १ यासह इतर ३ संचालक फुटल्याने संजय पवार चेअरमन पदी विजयी झाले.
याविषयी माहिती देताना आ. खडसे यांनी पत्रकार परिषदेत, शिवसेना व काँग्रेसने गद्दारी केली असा थेट आरोप लावला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने देखील तातडीने संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आ.शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा सरचिटणीस जमील शेख यांच्यासह जिल्हा बँकेचे तिन्ही संचालक विनोदकुमार पाटील, जनाबाई महाजन, शैलजादेवी निकम उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाकडून एकही संचालक फुटलेला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आत्मपरीक्षण करावे. आ. एकनाथराव खडसे यांचे आरोप फेटाळून लावत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच संचालक फुटले आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी दिली आहे. यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव दिसून आला असून एकमेकांकडे बोट दाखविण्याचा हा प्रकार भविष्यात कोणते चित्र दाखविणार याकडे राजकीय वर्तुळाचे व सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.