जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील सिंधी कॉलनीतील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलसह पाणीपुरीची गाडी आणि गॅस सिलेंडर चोरून नेले आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिम्मतसिंग जगतसिंग (वय-२५) हे कला भवन सिंधी कॉलनी येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. पाणीपुरीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. १३ मे रोजी सांयकाळी ४ ते २८ मे सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान घर बंद करून ते गावाला गेले होते. घर बंद असल्याचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील मोटारसायकलसह पाणीपुरीची गाडी आणि गॅस सिलेंडरची चोरी केली. हिम्मतसिंग जगतसिंग हे घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. १० जून रोजी त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहेत .