जळगाव (प्रतिनिधी) – जळगावातील प्रभाग १- जळगाव शहरात अमृत आणि भूमिगत गटारींच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून सोमवारी प्रभाग १ मध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते नारळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. दूध फेडरेशन ते शिवाजीनगरकडे जाणारा मुख्य रस्ता दुरुस्त होणार असल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

अमृत योजना आणि भूमिगत गटारींच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून प्रत्येक प्रभागातील रस्ते दुरुस्तीसाठी मक्ता देण्यात आला आहे. सोमवारी प्रभाग १ मध्ये दूध फेडरेशनसमोरील साईबाबा मंदिरापासून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीचा महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते पूजा करून आणि नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका सरिता नेरकर, नवनाथ दारकुंडे,अँड. दिलीप पोकळे, भारत सपकाळे, शहर अभियंता अरविंद भोसले आदींसह मनपा अधिकारी, मक्तेदार व परिसरातील नागरिक उपस्थित होते.मुख्य रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
जळगावातील प्रभाग ७ – शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता असलेल्या रिंगरोडच्या दुरुस्तीच्या कामाला सोमवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर पूजा करून नारळ वाढवून कामाचा शुभारंभ झाला.
रिंगरोड दुरूस्ती कामाच्या शुभारंभप्रसंगी महापौर सौ.भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, नगरसेविका सीमा भोळे, नगरसेवक प्रा.सचिन पाटील, मनोज काळे, भारत सपकाळे, प्रभाग समिती सदस्य जगदीश नेवे, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश वाणी, भाजप मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, मक्तेदार प्रवीण राणे आदींसह इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
शहराचा मुख्य मध्यवर्ती आणि प्रमुख वर्दळीचा रस्ता असलेल्या रिंगरोडवर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून अमृत योजनेच्या चाऱ्या खोदलेल्या असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सोमवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते रस्ते दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली असून मुख्य रस्ता दुरुस्त होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.







