मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना राज्यसरकारने विमान प्रवासाला परवानगी नाकारल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यपालांना विमानातून खाली उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल असं म्हणत मुनगंटीवार यांनी या बाबीचा निषेधही त्यांनी व्यक्त केला आहे.
मुनगंटीवार म्हणाले की, सरकारने राज्यपालांची क्षमा मागावी तसेच, राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यांनी क्षमा मागून हा विषय थांबवावा असं म्हटलं आहे.
तत्पूर्वी, राज्याच्या इतिहासात इतके इगो असलेले पहिलेच सरकार असून हा सगळा पोरखेळ सुरू असल्याची टीका फडणवीस यांनी पुण्यात केली आहे. तसेच या बाबीचा निषेधही त्यांनी व्यक्त केला आहे.







