नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील वाद संपुष्टात आल्याचे दिसत आहे.पँगाँग टीसओ तलावाच्या भागातून सैन्य मागे घेण्याबाबत चीन बरोबर सहमती झाल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी संसदेला दिली.
राजनाथ सिंह म्हणाले,पूर्व लडाख सीमेवर चीनकडून मागील वर्षापेक्षा अधिक शस्त्रे आणि दारुगोळा आणण्यात आला होता. यादम्यान भारतीनेही मोठया प्रमाणावर सैन्य तैनात केले. याप्रकरणी सप्टेंबरपासून दोन्ही देशांनी एकमेकांशी चर्चा केली. भारत चीन या दोन्ही देशांनी ठरविले आहे की, २०२० च्या आधी जी स्थिती दोन्ही देशांमध्ये होती ती परिस्थिती अंमलात आणली जावी.
चीनने १९६२ पासूनच भारतात अनेक भागात अतिक्रमण केले आहे. भारत-चीन सीमेवरच्या सद्यपरिस्थितीचा परिणाम हा दोन्ही देशांच्या संबंधावरही होईल, असेही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.
राजनाथ सिंह पुढे म्हंटले की, वाटाघाटीसाठी आमचे धोरण पूर्णपणे स्पष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही एक निर्देश आहे की भारत आपल्या जागेपैकी एक इंचही कोणालाही देणार नाही. याचाच परिणाम म्हणजे आपण कराराच्या स्थितीपर्यंत पोहचलो आहोत, असे त्यांनी सांगितले.
पूर्व लडाख भागातील पॅनगोंग तलावाजवळील परिस्थितीबद्दल राजनाथ सिंह म्हणाले की, भारत आणि चीनने पॅनगोंग तलावाच्या दक्षिण व उत्तर भागातून एकाचवेळी माघार घेण्याचे ठरविले आहे. यानुसार, टप्याटप्याने आणि समन्वय साधून भारत-चीन फॉरवर्ड भागातून सैन्य मागे घेईल.
पॅनगोंग सरोवराच्या परिसरातून दोन्ही देशांचे सैन्य पूर्णपणे माघारी फिरल्यानंतर ४८ तासांनी दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य कमांडर्समध्ये बैठक होईल. अन्य मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी या बैठकीत चर्चा होईल, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.







