जिल्हा परिषद अंतर्गत अधिकाऱ्यांनी केली कार्यवाही
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत विविध विभागांमध्ये कार्यरत १०९ कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून, तसेच प्रशासकीय गरजेनुसार व आपसी सहमतीने बदल्यांची प्रक्रिया दिनांक १३ मे रोजी पार पडली. ही प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने, पारदर्शक व निकोप वातावरणात पार पडली.
या बदल्यामध्ये सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ लेखाधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, व्रण उपचारक, पर्यवेक्षिका, कृषी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी शिक्षण या संवर्गाच्या बदल्या मंगळवारी पार पडल्या. या प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल या होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबूलाल पाटील यांचेसह सर्व विभागांचे विभाग प्रमुख या वेळी उपस्थित होते.
यावेळी सामान्य प्रशासन विभागातील प्रशासकीय ०९ व विनंती ४९ अशा एकूण ५८ बदल्या करण्यात आल्या. बांधकाम विभागातील ०२ प्रशासकीय तर १२ विनंती बदल्या करण्यात आल्या. ग्रामीण पाणी पुरवठा प्रशासकीय ०० तर विनंती ०१, अर्थ विभाग प्रशासकीय ०१ तर विनंती ०२, पशुसंवर्धन विभाग प्रशासकीय ० तर विनंती ०९, महिला बालकल्याण विभाग प्रशासकीय ०३ तर विनंती ०३, कृषि विभागातील प्रशासकीय ० तर विनंती ०४, तर शिक्षण विभागातील प्रशासकीय ११ तर विनंती ०३ कर्मचारी यांच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने पार पडल्या. उर्वरित ग्रामपंचायत विभाग व आरोग्य विभागातील तांत्रिक कर्मचारी यांच्या बदल्या बुधवार दि १४ मे रोजी करण्यात येणार आहेत. बदल्यांसाठी पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीचे पर्याय निवडण्याची संधी देण्यात आली. समुपदेशन पद्धतीने झालेल्या या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण निर्माण झाले असून, यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.