मुंबई (वृत्तसंस्था) – ‘महिला म्हणून कंगनाला संरक्षण देणं आमची नैतिक जबाबदारी आहे मुंबईने अनेकांना जगवलं आहे. मुंबई काही कुण्या एकट्याच्या बापाची जहागिरी नाही’, असं म्हणत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनेत्री कंगना रनौतचं समर्थन केलं आहे

‘कंगनाने मुंबई बद्दल केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. पण ती एक महिला आहे तिच्याबद्दल अशी भाषा वापरणं चुकीचं आहे. महिला म्हणून तिला संरक्षण देणं आमची नैतिक जबाबदारी आहे. मुंबईने अनेकांना जगवलं आहे. मुंबई काही कोण्या एकट्याच्या बापाची जहागिरी नाही’, असं रामदास आठवले म्हणाले.
‘मुख्यमंत्र्याबद्दल एकेरी शब्दात उल्लेख ती चिडली असल्यामुळं केला. पण, असा एकेरी उल्लेख करणं योग्य नाही. शिवसेना आणि अनेक पार्टीची कार्यायलं अवैध आहेत. ती तुम्ही तोडणार आहात का? मुख्यमंत्रांबद्दल बोलताना आदरपूर्वक बोललं पाहिजे. अशा प्रकारे सूडबुद्धीने कारवाई करणं योग्य नाही. 52 हजार कामं मुंबईत अवैध आहेत, ती तुम्ही तोडणार आहात का?’, असा प्रश्नही रामदास आठवले यांनी उपस्थित केला.
‘कंगनाचं ऑफिस तोडायला नको होतं. याआधी का तिच्यावर कारवाई केली नव्हती? शरद पवारांच्या काळात बांधकाम झालं याबाबद्दल मला माहित नाही. तिला माहित असेल म्हणून ती बोलली असेल. दाऊदची इमारत देखील अवैध असल्याचं सांगितलं. मग ती का तोडत नाहीत? तिच्या घराला हात लागता कामा नये’, असंही रामदास आठवले म्हणाले.
‘मंदिर, मस्जिद, चैत्यभूमी हे सगळं उघडलं पाहिजे. अनलोक सुरु झाल आहे. गाड्या, ऑफिसेस सुरु झाली. मग धार्मिक स्थळं का उघडली नाहीत? पोलीस बंदोबस्तात त्यांना उघडायला परवानगी द्यावी. मंदिराला परवानगी दिल्याने कोरोना वाढणार नाही. काल राज्यभर आम्ही आंदोलन केली आहेत, आज चैत्यभूमीवर आंदोलन केले. लवकरात लवकर चैत्यभूमी उघडतील ही अपेक्षा आहे’, अशी मागणी आठवले यांनी केली.







