देवकर रूग्णालयात महिलेला दिलासा
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात महिलेच्या छिद्र असलेल्या आतड्यांवर अतिशय गुंतागुंतीची आणि तातडीचे शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वीरित्या पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे बऱ्या झालेल्या महिलेला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.
भवरखेडा (ता. धरणगाव) येथील 45 वर्षीय महिलेवर तीन वर्षांपासून क्षयरोगाचा उपचार सुरू होता. तीन वर्षांनंतर महिलेचा क्षयरोग पूर्णपणे बरा झाला होता. मात्र यादरम्यान महिलेच्या आतड्याचा काही भाग खराब होऊन त्यांना छिद्र पडू लागले होते. परिणामी आतड्यातील घाण पोटात जात असल्याने त्यांना असह्य पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्रास अधिकच वाढल्याने महिलेच्या नातेवाईकांनी थेट देवकर रुग्णालय गाठले. येथील डॉक्टरांनी महिलेची संपूर्ण तपासणी केली असता छिद्र असलेल्या आतड्याचा भाग तातडीने काढणे गरजेचे असल्याचा निष्कर्ष निघाला. या शस्त्रक्रियेसाठी क्षणाचाही विलंब लावणे धोक्याचे होते. म्हणून शस्त्रक्रिया तातडीने करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. शस्त्रक्रिया मोठी गुंतागुंतीची होती, परंतु डॉक्टरांनी जोखीम घेऊन महिलेवर शस्त्रक्रिया सुरू केली. शस्त्रक्रियेदरम्यान आतड्याचा खराब भाग पूर्णपणे काढून टाकण्यात आला व त्या जागी चांगल्या आतड्याचा भाग यशस्वीरित्या जोडण्यात आला. तब्बल चार तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर महिलेवर येथील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. उपचारानंतर पूर्णपणे बऱ्या झालेल्या महिलेला पोटदुखीच्या त्रासापासून दिलासा मिळाला, याची खात्री झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. देवकर रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांमुळेच ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा दावा डॉक्टरांच्या टीमने केला. तर येथील अद्ययावत सुविधा, उपचार पद्धती आणि डॉक्टरांच्या समर्पणभावाचे महिलेच्या नातेवाईकांनी तोंड भरुन कौतुक केले.