नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात आपलं उत्तर देत आहेत. याआधी पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी (8 फेब्रुवारी) राज्यसभेला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी नव्या कृषी कायद्यांची पाठराखण केली होती. लोकसभेतील भाषणातही मोदींनी कृषी कायद्यांचं समर्थने केलं. यावेळी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर संतापलेल्या पंतप्रधानांनी काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांना समजही दिली.
हे सभागृह आणि सरकार आंदोलक शेतकऱ्यांचा आदर करतं असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं. सोबतच दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलकांमध्ये अफवा परवल्या गेल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदी म्हणाले की, “सातत्याने शेतकऱ्यांशी बातचीत सुरु आहे. शेतकऱ्यांच्या आक्षेपांवर चर्चा केली आहे. जिथे बदलाची गरज आहे त्यावर विचारही केला. शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हाच आमचा शुद्ध हेतू आहे.”
नवे कृषी कायदे लागू झाल्यानंतर कोणतीही मंडई बंद झाली नाही, असा दावा मोदींनी आपल्या भाषणात केला. दरम्यान पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान काँग्रेस खासदारांनी जोरदार गोंधळ घातला. सुरुवातीला मस्करीत काँग्रेस खासदारांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोदींनी नंतर मात्र त्यांना चांगलीच समज दिली. हे योग्य नाही, माझ्या मनात तुमचा आदर आहे. तुम्हाला बोलण्याची संधी देण्यात आली होती. आता गोंधळ थांबवा, असं मोदींनी काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांना सांगितलं. तसंच माझ्या भाषणात अडथळे निर्माण करणं ही सुनियोजित रणनीती असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान पतंप्रधान मोदींचं भाषण सुरु असतानाच काँग्रेस खासदारांनी सभात्याग केला. यानंतर मोदींनी काँग्रेसला टोला लगावला. “काँग्रेस न स्वत:चं भलं करु शकते ना देशाचं. काँग्रेस खासदारांची राज्यसभेत वेगळी भूमिका असते आणि लोकसभेत वेगळी भूमिका असते,” असं मोदी म्हणाले.







