पहूर( प्रतिनिधी ) – जामनेर तालुक्यातील पहूर गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या बसच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या हमाला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता पहूर पोलीस स्टेशनला बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहितीवरून, अरूण नाना मोरे (वय-५७) हे जामनेर तालुक्यातील पहूर येथे राहायला होते. हातगाडीवर सामान नेवून हमालीचे काम करून उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते हातगाडीने हमालीचा सामान घेवून जात होते. त्यावेळी पहूरकडून पाचोरा कडे जाणारी बस क्रमांक (एमएच १४ बीटी २०७९) वरील चालक गुणवंत भागवत गिते रा. पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा याने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव बस अरूण मोरे यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जामनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयता घोषीत केले. याप्रकरणी मयत अरूण मोरे यांचा मुलगा किरण अरूण मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात बसचालक गुणवंत भागवत गिते याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रविंद्र देशमुख करीत आहे.