जामनेर ( प्रतिनिधी ) – शेंदुर्णी येथील गोवींद अग्रवाल व त्यांच्या दोन पुत्रांनी बुधवारी कृषी पर्यवेक्षकास मारहाण केल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी शेतात लावल्या जाणार्या ट्रॅपप्रमाणेच प्रमाणेच जिनींमध्येही बोंडअळी नियंत्रणासाठीचे ट्रॅप लाऊन त्यासंदर्भातील फोटोसह माहिती विभागीय कृषी संचालक नाशिक यांचेकडे पाठवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
या अनुषंगाने शेंदुर्णी येथील रोहित चव्हाण यांना घेऊन कृषी पर्यवेक्षक कन्हैय्या महाजन हे गोवींद अग्रवाल यांच्या गोपाला जीनींमध्ये ट्रॅप लावण्यासाठी गेले असता अग्रवाल यांनी त्यांना अटकाव केला. ते आणि त्यांचे पुत्र नितीन व निलेश यांनी शिवीगाळ करीत कृषी पर्यवेक्षक महाजन यांना मारहाण केली. याप्रकरणी महाजन यांनी पहूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गोवींद्र अग्रवाल, नितीन अग्रवाल व निलेश अग्रवाल यांच्या विरूध्द शासकीय कर्मचार्यांस मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पी.एस.आय.दिलीप पाटील करीत आहेत.
या संदर्भात पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शासकीय नियमाप्रमाणे जिनींगमध्ये बोंडअळी नियंत्रणासाठी ट्रॅप लावावयास गेलो होते. आमच्या खाजगी प्रॉपर्टीत परवाणगीशिवाय कसा आला असे अग्रवाल यांनी धमकावून विचारले. गोवींद अग्रवाल यांचेसह त्यांच्या निलेश व नितीन या दोन्ही मुलांनी अंगावर येत शिवागाळ करून मारहाण केली. त्याचबरोबर ‘आमचे सरकार आहे, निलंबीत करून टाकू’ अशी धमकीही दिली.
दरम्यान, याच प्रकरणात अग्रवाल यांनी कन्हैय्या महाजन यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या घरात जबरदस्तीने घुसला. या कागदावर सही कर असे म्हणून घरातील सुनेशी अश्लील व लज्जा उत्पन्न होईल अशा भाषेत बोलू लागला. तेथून बाहेर व्हरांड्यात आल्यानंतर मी त्यास विचारणा केली. त्यावेळी मी कृषीसहाय्यक आहे. तुला माहिती नाही काय? तुझे हातपाय तोडतो. असे बालून पाच लाख रूपयांची लाच मागू लागला. पैसे न दिल्यास शासकीय कामकाजात अळथडा आणल्याप्रकरणी खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. महिलांचा विनभंग व मला शिवीगाळ केल्याप्रकरणी कन्हैय्या महाजन यांचेविरूध्द कठोर कार्यवाही व्हावी अशी तक्रार नितीन गोवींद अग्रवाल यांनी शेंदुर्णी औट पोस्टला दिली.