नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – टोल वसुलीसाठी प्रचलित फास्टॅग सिस्टीम हद्दपार होण्याची शक्यता आहे. आता नेव्हिगेशन सिस्टीमचा वापर केला जाणार आहे. प्रायोगिक तत्वावर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर नेव्हिगेशन सिस्टीम कार्यान्वित केली जाईल. यानुसार वाहनाने कापलेल्या अंतराच्या आधारावर टोल टॅक्स आकारणी केली जाईल.
फास्टॅग प्रणालीनुसार एक वेळ टोल टॅक्सची कपात केली जाते. महामार्गावरुन धावणाऱ्या गाडीसाठी टोल प्लाझावर विशिष्ट स्वरुपाच्या रकमेची फास्टॅग अकाउंट मधून कपात केली जाते. त्यात वाहनाने कापलेल्या अंतराचा आधार घेतला जात नाही. मात्र, नेव्हिगेशन सिस्टीमवर किलोमीटरच्या आधारावर पैसे घेतले जातील.
नव्या प्रणालीनुसार, महामार्ग किंवा द्रूतगती मार्गावर निर्धारित प्रवासाच्या किलोमीटर नुसार टोल टॅक्स अदा करावा लागेल. किलोमीटर आधारावर टोल टॅक्स प्रणाली युरोपीय राष्ट्रांत यशस्वी ठरली आहे. जर्मनीत 99 टक्के गाड्यांत नेव्हिगेशन सिस्टीम द्वारे टोल आकारणी केली जाते.
महामार्ग किंवा द्रूतगती मार्गावर गाडीने प्रवास सुरू केल्यास टोल मीटर ऑन होईल. प्रवास संपल्यानंतर नेव्हिगेशन सिस्टीमद्वारे पैसे कपात केले जातील. तुम्ही केलेल्या प्रवासानुसारच पैसे कपात केले जातील. भारतात सध्या 97 टक्के गाड्यांत फास्टॅग आहे आणि त्यानुसारच पैसे घेतले जातात.