नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात आजपासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात जेडीयू-भाजपचं सरकार आलं तर कोरोनाची लस मोफत दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. त्यावर बिहार सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून लसीकरणाचा पुढला टप्पा सुरू होत असून बिहारच्या मंत्रिमंडळाने खासगी रुग्णालयात देखील मोफत लस देण्याचा निर्णय मंजूर केला आहे.
1 मार्चपासून देशात COVID19 विरोधातील लसीकरण मोहिमेचा पुढला टप्पा सुरू झाला आहे. यामध्ये 60 वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. तसेच 45 ते 59 वयाच्या गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनाही लस देण्यात येणार आहे.
यावेळी बिहार सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. कारण विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने त्यांचं सरकार आल्यास मोफत लस टोचणार असं आश्वासन दिले होते. खासगी रुग्णालयात 250 रुपये इतक्या दराने ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र बिहारमधील नागरिकांना ही लस मोफत देण्यात येणार आहे.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच लस टोचली. त्यानंतर आजच बिहारच मुख्यमंत्री नीतीश कुमार देखील कोविड-19 लसीचा पहिला डोस देतील. विशेष म्हणजे आज नीतीश कुमार यांचा वाढदिवस आहे.