जळगाव (प्रतिनिधी) – जीवनात अनेक धक्के बसताहेत, आता कंटाळा आलाय यासह इतर बाबींचा उल्लेख करुन पानभर सुसाईड नोट लिहून रिंगरोड परिसरातील इलेक्ट्रीक दुचाकीच्या शोरुमची मॅनेजर प्रियंका मदन दास वय २७ मूळ रा. रेल्वे फिटर हाऊस, भुसावळ, ह.मु. जिल्हा बँकेच्या मागे, सिभागवाडी या तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे.

भुसावळ येथील रहिवासी प्रियंका ही जळगाव शहरातील रिंगरोड परिसरात एका दुचाकीच्या शोरुममध्ये दोन वर्षापासून नोकरीला होती. या नोकरीनिमित्ताने ती रिंगरोड परिसरातच जिल्हा बँकेच्या मागील बाजूस खोलीत भाडे करारावर खोली एकटीच वास्तव्यास होती. सोमवारी सायंकाळ होवूनही प्रियंका शोरुमध्ये कामाला आली नाही. त्यामुळे शोरुममधील कर्मचारी विजय गोकूळ परदेशी प्रियंका राहत असलेल्या घरी गेला. याठिकाणी खिडकीतून डोकावून पाहिले असता, प्रियंका गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. परदेशी यांनी शोरुममध्ये तसेच जिल्हापेठ पोलिसांना प्रकार कळविला. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विलास शेंडे, पोलीस उपनिरिक्षक प्रदीप चांदेलकर, कर्मचारी करुणासागर, तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तसेच प्रियंका हिच्या भुसावळ येथील कुटुंबियांना प्रकार कळविला. मंगळवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे.







