मुंबई (वृत्तसंस्था) – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज अखेर शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, खासदार प्रियांका चतुर्वेदी देखील उपस्थित होत्या.

आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत उर्मिला मातोंडकर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. आता शिवसेना उर्मिला मातोंडकर यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवणार याची उत्सुकता आहे. महत्त्वाचं म्हणजे विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांमध्ये शिवसेनेने आपल्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना आधीच उमेदवारी दिली आहे.
2019 मधील लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. यात भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता. या पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकर यांनी पक्षाला रामराम केला होता. मात्र आता तीच काँग्रेस शिवसेनेसोबत मांडीला मांडी लावून सत्तेत विराजमान आहे. त्यामुळे उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना प्रवेशासाठी राजकीय विश्लेषक वेगळ्या अनुषंगाने पाहत आहेत.
पक्षप्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मीनताई ठाकरे यांच्या प्रतिमेला नमन केलं. ‘फार असं वाटतंय की असायला पाहिजे होते हे, एकच गोष्ट खरोखरच मिस करतेय,’ अशा भावना उर्मिला मातोंडकर यांनी यावेळी व्यक्त केल्या.







