जळगाव ( प्रतिनिधी ) – राज्य सरकारकडे प्रलंबित १० मागण्यांसाठी तहसीलदार , नायब तहसीलदारांच्या संघटनेने आता राज्यात येत्या ४ मेपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे .
यासंदर्भात कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , आज राज्यभर सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन केले जात आहे . १८ एप्रिल रोजी संघटनेचे सर्व सदस्य सामूहिक रजा टाकून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत . तरीही राज्य सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्यास येत्या ४ मेपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा या संघटनेने दिला आहे .
नायब तहसिलदार संवर्गाची सेवा जेष्ठता यादी व तहसिलदार संवर्गाची सन 2011 पासूनची सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करा , नायब तहसिलदार संवर्गातून तहसलिदार संवर्गात व तहसिलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती , नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांची कालबध्द पदोन्नती बाबतचे प्रलंबीत प्रस्ताव तात्काळ निकाली काढा , परिविक्षाधीन नायब तहसिलदार व तहसिलदार यांचे परिविक्षाधीन कालावधी समाप्ती बाबतचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे , नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांचे स्थायित्व प्रमाणपत्राबाबतचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे.
प्रलंबीत सेवा जोड प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे. सेवा निवृत्त नायब तहसिलदार व तहसिलदार यांचे प्रलंबीत सेवानिवृत्ती व संबंधीत लाभ तात्काळ निकाली काढणे. महिला अधिकाऱ्यांचे महसूल विभाग वाटप करतांना प्राधान्यांने सोईचे ठिकाण देण्याबाबत सुधारणा अशा या संघटनेच्या मागण्या आहेत.