कर्ज मंजूर करण्याच्या आमिषाने घटना, गुन्हा दाखल
मुक्ताईनगर (प्रतिनिधी):- कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून मुक्ताईनगर येथील एका ज्येष्ठ शेतकऱ्याची १ लाख ६० हजार ५०० रुपयांची ऑनलाइन आणि रोख स्वरूपात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रवींद्र भास्कर पोहेकर (वय ५९, रा. नायगाव, ह.मु. गोदावरी नगर, मुक्ताईनगर) हे शेती व्यवसाय करतात. त्यांना पैशांची गरज असल्याचे पाहून संशयित आरोपी गणेश सातपुते (रा. जळगाव) आणि निलेश चक्रधर बुंदले (रा. भुसावळ) यांनी संगनमत करून त्यांना गाठले. “आम्ही तुमचे मुथूट होमफिन फायनान्स लिमिटेड, जळगाव येथून कर्ज मंजूर करून देतो,” अशी खात्री त्यांनी फिर्यादीला पटवून दिली.
संशयितांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या व्हॉट्सॲपवर कर्ज मंजुरी पत्र आणि चेकच्या फोटोकॉपी पाठवल्या. कर्ज प्रक्रियेच्या नावाखाली २३ जानेवारी २०२५ ते ११ मार्च २०२६ या कालावधीत वेळोवेळी एकूण १ लाख ६० हजार ५०० रुपये ऑनलाइन आणि रोख स्वरूपात उकळले. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही कर्ज मिळाले नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे पोहेकर यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी रवींद्र पोहेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आरोपी गणेश सातपुते व निलेश बुंदले यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश चव्हाण हे करीत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









