स्टार्टअप्स अंतर्गत एआयचे महत्त्व अन् भावी संधी विषयावर व्याख्यान
जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अपेक्स स्टार्टअप ग्रुपच्या सहकार्याने आयोजित एआयचे महत्व अन् भावी संधी या विषयावरील व्याख्यानात विद्यार्थ्यांनी एआय तंत्राज्ञानाचे धडे गिरविले.
गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे अपेक्स स्टार्टअप ग्रुपच्या सहकार्याने स्टार्टअप्समध्ये एआयचे महत्त्व आणि भावी संधी या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील हे उपस्थित होते तसेच *विशेष अतिथी म्हणून वरिष्ठ, वैज्ञानिक महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लीकेशन सेंटरचे डॉ. आनंद शाक्य, एंजल इन्वेस्टर, लेखक व वक्ते कमलेश भगतकर, संस्थापक, पेक्स स्टार्टअपचे अजिंक्य तोतला, खान्देश इनक्युबेशनचे सीईओ सागर पाटील प्राचार्य डॉ. व्ही.एच. पाटील, अधीष्ठाता प्रा. तुषार कोळी हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन तसेच गोदावरी आजींच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून झाली. प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. यानंतर अजिंक्य तोतला यांनी उद्योजकीय प्रवास कथन करत विद्यार्थ्यांना कल्पना प्रत्यक्षात कशा उतरवायच्या, अपयशातून धडा घेऊन यशस्वी स्टार्टअप्स कसे घडवायचे याबाबत उदाहरणे दिली. त्यांनी स्थानिक स्तरावर स्टार्टअप्स कसे उभारले जाऊ शकतात याची वास्तवदर्शी मांडणी केली. सागर पाटील यांनी विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या इन्क्युबेशन सुविधा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आर्थिक मदत, उद्योगजगताशी जोडणारे नेटवर्किंग याबद्दल सविस्तर माहिती दिली. डॉ. आनंद शाक्य यांनी अवकाश संशोधन क्षेत्रातील करिअरच्या असंख्य संधींचा त्यांनी आढावा घेतला. कमलेश भगतकर यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप्स व एआय यांची सांगड घालून राष्ट्रनिर्मितीमध्ये युवाशक्तीचे योगदान कसे महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. सूत्रसंचालन व आभार तुळजा महाजन या विद्यार्थिनीने मानले. या उपक्रमा बद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.